राफेलच्या किमती वाढल्या कशा? सर्वपक्षीय समितीपुढे चौकशी व्हावी : शरद पवार
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

आम्ही सत्तेत असताना राफेल विमानांच्या खरेदीचा निर्णय झाला. किंमत ठरलेली होती. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ठरलेली रु. ६५० कोटींची विमाने मोदींनी १६०० कोटींना विकत घेतली. त्यांचं समर्थन मी अजिबात केलेलं नाही आणि कधी करणारही नाही. राफेल विमानाची किंमत ६५० कोटींवरून १६०० कोटी कशी झाली याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने पार्लमेंटला द्यावं. या प्रकरणाची सर्वपक्षीय चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यासमोर खरेदीची सर्व कागदपत्रं ठेवली गेली पाहिजेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

बोफोर्सवर बोलणारे आज राफेलबाबत मौन बाळगून आहेत

'बोफोर्स प्रकरणात आरोप झाले तेव्हा राजीव गांधी चौकशीला सामोरे गेले, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. तेव्हा चौकशीची मागणी करणारे आज सत्तेत आहेत. मात्र आज ते राफेलवर बोलत नाहीत. या व्यवहारात सरळ देशाचीच लूट करण्याचा प्रकार घडला आहे, असे सांगतानाच 'आज चार वर्षांत आपल्या शेकडो सैनिकांची हत्या पाकिस्तानच्या सैन्याने केली. पण देशाला सशक्त करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारने काहीही केले नाही. उलट आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात. इथे हल्ले सुरूच आहेत. मात्र त्यांना उत्तर देणं ५६ इंचांच्या छातीवाल्या सरकारला अद्याप काही जमलेलं नाही', असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.

सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही

हजारो शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. दुर्दैवाने बीड जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. कर्जबाजारीपणा त्याचं महत्त्वाचं कारण. शेतकऱ्याने पेरणी केली आहे तर आता पावसाचा पत्ता नाही. बीडला येताना वाटेत थांबून शेतांची पाहणी केली तर पिकं सुकली आहेत. पण या सरकारला शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी वाढले आहेत. यामुळे महागाईला निमंत्रण मिळाले आहे. यासंबंधीची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही.