झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा महाअंतिम सोहळा चांगलाच रंगला. यशवंत सातारा आणि पुणेरी उस्ताद या दोन संघांमध्ये हा अटीतटीचा सामना खेळला गेला. यात शेवटी यशवंत साताऱ्याची विजयश्री मोडीत काढून पुणेरी उस्तादने विजयचषकावर आपले नाव नोंदवले. मालिका विजयाचा मानकरी पुणेरी उस्तादचा आर्मीमॅन विनोद कुमार ठरला.
आजपर्यंत सर्व सामने जिंकण्यासाठी लोकप्रिय असलेल्या यशवंत सातारा संघाला पुणेरी उस्तादने धूळ चारली. 4-2 अशा गुणांनी पुण्याने साताऱ्यावर मात केली आहे. यातील 86 पेक्षा अधिक वजनगटातील गणेश जगताप विरुद्ध आदर्श गुंड हा निर्णायक डाव अत्यंत रंजक ठरला. पुणेरी उस्तादच्या गणेशने 7-2 ने संघाला चौथा विजय मिळवून देत महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये बाजी मारली.
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेत्या संघाला 50 लाख, उपविजेत्यांना 30 लाख, तर तिसर्या संघाला 20 लाखांचे इनाम देण्यात आलेया दंगलीचे हे पहिले पर्व होते. आता ही दंगल दरवर्षी होणार आणि पुढच्या वर्षी अधिक मोठ्या स्तरावर होईल, याची परिषद काळजी घेईल, असे शरद पवार यांनी आश्वासन दिले.
श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये रंगलेल्या या महाअंतिम सोहळ्यासाठी सिनेसृष्टीमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांचेदेखील संघ सामील होते.