काल पावसाने घातलेले थैमान अनेकांसाठी जीवघेणे ठरले आहे. शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून तब्बल 15 कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोड या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर आल्कन स्टायलस आणि कांचन बिल्डर्सच्या एकूण आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये साईट इंजिनीअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांचाही समावेश आहे.
बिहारच्या कटिहारमधील बलरामपूर पोलिस ठाणे क्षेत्रातील बघार गावांतील हे सर्व कामगार होते. आता कांचन बिल्डर्सच्या पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मीकांत गांधी तसेच जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा: पुणे: इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर पडली, 15 जणांनी गमावला जीव)
चौकशी दरम्यान ही भिंत पडू शकते अशी तक्रार नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या घटनेला बिल्डरसोबतच महापालिकेचे अधिकारीही दोषी आहेत, असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही घटनास्थळी भेट घेऊन मृतांबद्दल हलाहल व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात केली आहे, तर बिहार सरकारने दोन लाखाची मदत जाहीर केली आहे.