सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra) आवारात तोडफोड करून फलकावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणावर आधारित नाटक सादर केले. या नाटकात अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्याने पात्र साकारताना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले होते. (हेही वाचा - Pune: 'रामलीला' नाटकात सीतेला धूम्रपान करताना दाखवल्याप्रकरणी पुण्यातील प्राध्यापकासह 5 विद्यार्थ्यांना अटक)
विद्यापीठातील सुरक्षा रक्षक जगन्नाथ शंकर खरमाटे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल राजेंद्र शिळीमकर, शिवम मारुती बालवडकर, किरण चंद्रकांत शिंदे, सनी रमेश मेमाणे, प्रतीक कुंजीर आणि दयानंद शिंदे यांच्यासह इतर पाच ते सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्राच्या फलकावर शाईफेक केली. तसेच, खिडकी, सूचना फलकाच्या काचा आणि कुंड्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे, चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे घटनास्थळी दाखल झाले.