Pune: वाहतूक पोलिसाचे प्रसंगावधान; अपघातामध्ये जखमी झालेल्या 8 वर्षांच्या मुलीचे 'असे' वाचवले प्राण, होत आहे कौतुक  
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

‘आजकाल माणुसकी राहिली नाही’, हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र गरज पडल्यास कोण, कसे मदतीला धावून येईल हे काही सांगता येणार नाही. अशीच एक घटना पुण्यातील (Pune) वारजे (Warje) परिसरात घडली आहे. एका वाहतूक पोलिसाने रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला वेळीच रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचवले आहेत. ही घटना 14 एप्रिल रोजी घडली होती. या आठ वर्षांच्या पीडित मुलीची प्रकृती आता सुधारत आहे. अपघातानंतर तातडीने मदत करून मुलीला रुग्णालयात नेल्याबद्दल मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांचे आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरील वारजे परिसराजवळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीदरम्यान एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने, हा ट्रक समोर उभ्या असलेल्या कारवर आदळला. कारमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह कुटुंबातील चार सदस्य होते. या अपघातात गाडीत असलेले मनोज, त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले. या अपघाताच्या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याचदरम्यान तिथे वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बाग सिरीज ड्युटीवर होते.

समीर यांनी पाहिले की, मागील सीटवर बसलेली एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता त्यांनी मुलीला उचलले आणि रुग्णालयात नेण्यासाठी ट्रॅफिकमध्ये धावू लागले. त्याचवेळी रिक्षाचालक रामदास नवले यांनी समीर यांना पाहिले व त्यांना मदत देऊ केली. अशाप्रकारे रिक्षामधून या मुलीला वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले व त्यामुळे तिचे प्राण वाचले. मुलीच्या आई-वडिलांना आणि बहिणीलाही नंतर रुग्णालयात नेण्यात आले आणि आता ते सर्व ठीक आहेत. (हेही वाचा: Wardha: वर्धा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर धावत्या मारुती व्हॅनला आग, कोणतीही जीवित हानी नाही)

पीटीआयशी बोलताना, मुलीच्या आईने बाग सिरीज आणि इतर वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक लोकांचे त्यांनी त्वरित कारवाई करून आपल्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानले. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये त्या म्हणतात, ‘वारजे पुल परिसरात झालेल्या या अपघातात पुराणिक कुटुंबातील जखमी मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांचे हे काम इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे. समीर बागसिराज आणि रामदास नवले यांच्यासारखी मनसे समाजासाठी आदर्श आहेत. या दोघांचेही मनापासून आभार’