Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांना घरात बसून त्याच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर पोलीस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु त्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. याच दरम्यान आता पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याची COVID19 वर यशस्वी लढा देऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

धनकवडी चैतन्यनगर येथील सहकार नगर पोलीस स्थानकातील कर्मचारी श्री प्रकाश मरगजे यांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे. त्यामुळे सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी त्यांचे टाळ्या आणि पुष्पवृष्टी करत आनंद व्यक्त करुन स्वागत केले आहे. राज्यातील पोलीस दलातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे. (महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा)

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 2598 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 698 कोरोना संक्रमितांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या आता 18616 इतकी आहे. राज्यात आजघडीला कोविड 19 विषाणू संक्रमित रुग्णसंख्या 38939 असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.