
पुणे सिटी पोलिसांकडून आज 27 जुलैच्या सकाळी खराडी भागात एका उच्चभ्रू सोसायटीमधील घरात धाड टाकली आहे. या ठिकाणी ड्रग्स सह कोकेन देखील जप्त केले आहे. पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये रोहिणी खडसे यांचे पती तर माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khevalkar) यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 2 महिला आणि 4 पुरूषांचा समावेश आहे. ही धाड रात्री 3 च्या सुमारास पडली आहे. अशी माहिती क्राईम ब्रांच च्या अधिकार्यांनी दिल्याचं वृत्त आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, "आम्हाला खराडी येथील एका ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. आमच्या पथकाने पहाटे एका स्टुडिओ अपार्टमेंटवर छापा टाकला. दोन महिला आणि पाच पुरुषांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाच जणांमध्ये प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे. छाप्यादरम्यान, आम्ही दारूसह कोकेन आणि गांजा यासह ड्रग्ज जप्त केले. प्राथमिक फील्ड किड चाचण्यांमध्ये या ड्रग्जची पुष्टी झाली आहे," असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर हे यापूर्वी देखील चर्चेत आले होते. खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती.
प्रांजल खेलवलकर हे डॉक्टर आहेत. सोबतच ते उद्योजक आणि प्रोड्युसर देखील आहेत. ओटीटी क्षेत्रात ते संधी शोधत होते. ते साखर आणि वीज उद्योग तसेच इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही काम करत होते.