Pune Rains 2019: पुणे शहराला पुढील 72 तास अतिवृष्टीचा धोका; वाहतूकीसाठी सहा पूल बंद
Pune Rains (Photo Credits: Twitter/ Sandip Pawar)

Pune Rains 2019 Traffic Update: मुंबई, कोकण सह नाशिक आणि पुण्यात धुव्वाधार कोसळणारा पाऊस अजून काही दिवस अशाच प्रकारे कोसळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे शहराला पुढील 72 तास अजूनही अतिवृष्टीचे आहेत. त्यामुळे 9 ऑगस्टपर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीसाठी सुमारे सहा पूल बंद करण्यात आले आहेत.  पहा महाराष्ट्रातील आजच्या पावसाचे लाईव्ह अपडेट्स   

कोल्हापूर परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने  पुणे- बेंगळूरू वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पुण्यातीलही काही पूलही पाण्यात गेल्याने वाहतूक कोलमडली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड येथील कोणते पूल बंद?

मूळा, मुठा, पावना या नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने आता पुणे शहरासह , पिंपरी चिंचवड भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुणे शहरात मुठा नदीवरील डेक्कन येथील भिडे पूल आणि महापालिका भवनासमोरील जयंतराव टिळक पूल रविवार ( 4 ऑगस्ट) पासून वाहतुकीसाठी बंद आहेत. पुण्यातील भिडे पूलदेखील पाण्याखाली गेला आहे. टिळक पुलाच्या एक बाजूने पुलावरून पाणी वाहत असल्याने नदी पात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसराकडे जाण्यासाठी ठराविक रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड येथील हॅरिस पुलाखालून भाऊ पाटील रस्त्याला जोडणारे दोन्ही पूल नदीपात्रातच असल्याने मागील काही दिवसांपासून बंद आहेत.

पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आजही कायम असल्याने शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही प्रमुख धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.