राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे (Pune) दौऱ्यानंतर पुण्यातील खड्डेमय रस्त्यांबाबतचा दीर्घकाळ चाललेला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या ताफ्याला पुण्यात खडबडीत रस्त्यांचा सामना करावा लागला, त्यामुळे आता मुर्मू यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून रस्त्यांच्या स्थितीबाबत निराशा व्यक्त केली. शिवाजीनगर ते हिंजवडीपर्यंत सुरू असलेल्या मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शहरातील रस्ते विशेषतः गणेश खिंड रोडवर बरेच खड्डे आहेत आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करूनही रस्त्यांची स्थिती कायम आहे.
याआधी 2 सप्टेंबर रोजी शहराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांना रस्त्यावरील खड्ड्यांच्या रूपाने असलेल्या धोक्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहून याबाबत असंतोष व्यक्त केला आणि तत्काळ कारवाईची मागणी केली. पत्रात, राष्ट्रपती कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 सप्टेंबरच्या नियोजित दौऱ्यापूर्वी खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची निकड अधोरेखित केली आहे.
त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी शनिवारी नागरी संस्थेला पत्र लिहून शहरातील रस्त्यांची स्थिती अधोरेखित केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पुणे दौऱ्यापूर्वी रस्त्यांच्या सुधारात्मक उपाययोजनांची मागणी केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शहरातील अनेक रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आम्ही पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या आगामी भेटीपूर्वी सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही त्वरित सुधारात्मक उपायांची विनंती केली आहे.’ (हेही वाचा: Pune Truck Accident: बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)
याबाबत पीएमसी रस्ते विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘पुणे पोलिसांच्या निर्देशानुसार आम्ही काम सुरू केले आहे आणि पॅचवर्क, रिसरफेसिंग आणि स्पीड ब्रेकर काढण्याचे सर्व काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी ते पूर्ण केले जाईल. दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र, भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाने पुण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत त्यांना पत्र लिहिल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तांचे खंडन केले.