पुणे: कोरोनामुळे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई दिपक नथुराम सावंत यांचा मृत्यू
Police constable Deepak Nathuram Sawant (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार मजावला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) महत्वाचा वाटा उचलत आहेत. मात्र, आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच पुण्याच्या (Pune) वाहतूक विभागातील पोलीस शिपाई दिपक नथुराम सावंत (Deepak Nathuram Sawant) यांचा कोरोनाशी झुंज देत असाताना मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात गेल्या 24 तासात तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली. दिपक सावंत हे 42 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

महाराष्ट्र पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी, एएसआय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांच्या मृत्यूची घटना ताजी असताना दिपक सावंत यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. दिपक सावंत यांच्या मृत्युनंतर पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत. तसेच दिपक सावंत यांच्या दुःखात सहभागी आहे, आमची सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम राहील, अशा आशायाचे ट्वीट त्यांनी पुणे शहर पोलिसाच्या हॅंडलवरून करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना विषाणूच्या बंदोबस्तावर असाताना अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे देखील वाचा- मुंबई: कोरोना विषाणूमुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा मृत्यू

ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 297 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 390 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 318 जणांनी कोरोनावर मात केली आहे.