विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात सध्या नशेचा व्यापार जोर वाढताना दिसत आहे. पुणे - नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सागर कुमार, शिवम सरोजअशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (हेही वाचा - Ganpat Gaikwad Atrocity Case: भाजप आमदार गणपत गायकवाड विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल)
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. दोघांकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल असा 69 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई केली. दरम्यान पुणे शहरात गेल्या काही दिवासांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.