सध्या राज्यात मल्टीप्लेक्स (Multiplexe), थिएटर्स (Theatres) सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु, त्यांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोविड-19 संकटामुळे बंद असलेली थिएटर्स दीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरु झाली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा थिएटर्स कडे वळवणे हे मोठे आव्हान थिएटर्स मालकांसाठी असणार आहे. यासाठी काही स्पेशल ऑफर्स, मोफत तिकीटे (Free Tickets) आणि क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Livestreaming of Matches) यांसारखे पर्याय मल्टीप्लेक्सकडून वापरले जात आहेत. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
कोविड-19 संकटानंतर थिएटर इंडस्ट्रीला खूप मोठा फटका बसला होता. त्यामुळे बहुतांश हिंदी चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे आता थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज करण्यास निर्माते धजावत नाहीयेत, असे थिएटर मालकांचे म्हणणे आहे. (Pune Corona Update: पुणे जिल्हा प्रशासनाने दिवाळी पहाट कार्यक्रमांना दिली परवानगी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती)
"येत्या आठवड्यामध्ये काही इंग्रजी सिनेमे थिएटर्समध्ये दाखवले जातील. 50 टक्के आसन क्षमतेच्या आधारावर मिळणाऱ्या उत्पन्नावर थिएटर मालक सध्या समाधानी आहेत. मात्र हिंदी सिनेमांसाठी ही खूप मोठी रिक्स आहे. दिवाळीपर्यंत यात अजून काही सवलत मिळेल, अशी आम्हाला आशा आहे," असे मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी अरविंद चाफळकर म्हणाले.
INOX Leisure Ltd यांनी आज, 22 ऑक्टोबर रोजी मोफत तिकीटांची घोषणा केली होती. प्रेक्षकांचे थिएटर्समध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही फ्री तिकीट देत आहोत, असे INOX चे रिजनल डिरेक्टर अतुल भंडारकर म्हणाले. 24 ऑक्टोबर रोजी टी-20 वर्ल्डकप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार असून या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिम करण्याची परवानगी मिळण्याचा प्रयत्न काही मल्टीप्लेक्स करत आहेत.