MNS | (Photo Credits: Twitter)

पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजीनाट्य अखेर बाहेर आले आहे. त्यामुळे पुणे मनसेला जोरदार धक्का बसला आहे. पुणे मनसेतील आक्रमक नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक आणि पुणे मनसे माथाडी कामगार सेना माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे (Nilesh Mazire) यांनी मनसेला 'राम राम' ठोकला आहे. वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक अशी निलेश माझीरे यांची ओळख आहे. पाठिमागील काही दिवसांपासून स्वत: वसंत मोरेच हे पुणे मनसेतून काहीसे बाजूला फेकले गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे माझिरे हे काही दिवसांपासून नाराज होते. अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत बाजूला होणे पसंत केले आहे.

निलेश माझिरे यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे पुणे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर आणि कोअर कमिटीतल सदस्य हेच आपल्या पक्षातून बाहेर जाण्यास कारणीभूत असल्याचे माझिले यांनी पक्ष सोडताना स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष नेतृत्व माझिरे यांच्या आरोपांची दखल घेणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Hanuman Chalisa Loudspeaker Row: तिरुपती बालाजीला गेलेले मनसे नेते वसंत मोरे नॉट रिचेबल, 'राज'आज्ञा मोडल्याची चर्चा)

पुणे मनसेत हुकुमशाही सुरु असल्याचा आरोप करत निलेश माझिरे यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी आपण पक्षातून बाहेर पडणार अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पुणे शहराध्यक्ष गजानन बाबर यांनी जाहीरपणे केली होती. दुसऱ्या बाजूला बाबू वागस्कर यांनी तर तू पक्षात राहणार आहेस का? असा सवालच मला विचारला होता. तू पक्षात राहणार आहेस का? असे कसे विचारु शकता? हे वर्तन म्हणजे पक्षात हुकुमशाही सुरु नव्हे तर काय आहे? असे म्हणत पक्षात हुकुमशाहीच सुरु असल्याचा आरोपही माझिरे यांनी केला.

पक्षात मिळत असलेल्या वर्तनाबाबत आपण वसंत मोरे यांना अनेकदा कळवले होते. मी त्यांचा समर्थक असल्यामुळे त्यांनी माझ्यासाठी अनेकदा आपले शब्द खरेदी केले. पण ते तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी किती वेळा शब्द खर्च करणार. मी त्यांचा समर्थक असल्यानेच माझे पुणे मनसे माथाडी कामगार सेना शहराध्यक्ष पद काढून घेत का? असा सवाल माझिरे यांनी उपस्थित केला आहे. माझिरे आता कोणती राजकीय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.