Pune Metro: 'शरद पवार यांनी कोणत्या अधिकाराने मेट्रोचा ट्रायल घेतला होता? न केलेल्या कामाचे श्रेय लाटायचे होते?'- BJP ची टीका
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याआधी पुण्यात पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी स्टेशनवरून पुणे मेट्रोची (Pune Metro) ट्रायल घेतली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NArendra Modi) यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. यासाठी राज्य सरकार आणि भाजपने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होती. या कार्यक्रमाला शरद पवार यांना निमंत्रण नव्हते. उद्घाटनानंतर महाराष्ट्र भाजपने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी कोणत्या अधिकाराने मेट्रोचा ट्रायल घेतला होता? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. पंतप्रधानांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत, त्यापेक्षा त्यांनी युक्रेनमधील भारतीयांना मदत करावी, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र भाजपने टीका करत म्हटले आहे की, ‘आदरणीय शरद पवार साहेबांचे दुःख कार्यक्रमाला बोलवले नाही याचे आहे. पण, पवार साहेबांनी कोणत्या अधिकाराने मेट्रोचा ट्रायल घेतला होता? तो ही कुणाला न सांगता. न केलेल्या कामाचे श्रेय लाटायचे होते का?’

शरद पवार यांनी मेट्रोचे अपूर्ण काम आणि पीएम मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावर केलेल्या भाष्याला उत्तर देताना भाजपने म्हटले होते की, ‘आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोक झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतली होती ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमले नाही.’ (हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात 'Olectra'च्या 150 इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन, जाणून घ्या बसची वैशिष्टये)

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय दौऱ्यावर पुण्यात पोहोचले. त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. ही मूर्ती 1850 किलो वजनाच्या धातूपासून बनवण्यात आली असून ती सुमारे साडेनऊ फूट उंच आहे. यानंतर पीएम मोदींनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यानंतर त्यांनी स्वतः तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला. मेट्रोच्या प्रवासादरम्यान पीएम मोदींनी शाळकरी मुलांशी आणि मेट्रोमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांशी संवाद साधला.