Crime Patrol: पुणे येथे क्राइम पेट्रोल पाहून प्रेयसीचा खून; पैशाच्या वादातून प्रियकराचे कृत्य
Murder | (Photo Credits: PixaBay)

प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील आर्थिक वादाने जीवघेणे पाऊल उचलले. प्रियकराने प्रेयसीचा खून केला. धक्कादायक म्हणजे आरोपीने 'क्राईम पेट्रोल' (Crime Patrol) पाहून खून केला. तसेच, स्वत:चा बचाव करण्यासाठी चक्क चोरीचा बनाव रचला. पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र त्याचा बनाव उघडा पडला. ही घटना पुणे शहरातील हडपसर (Hadapsar) येथील वैदूवाडी परिसरात घडली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या यूनीट पाचच्या पथकाने तातडीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. किसन सीताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, पुरंदर) असे आरोपीचे नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीच्या मुलीचे लग्न होते. मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे आरोपीने सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) नामक महिलेची हत्या केली. सुनिता कदम या महिलेस तो 2009 पासून ओळखत असल्याची माहिती आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशीही चर्चा आहे. दरम्यान, सुनीता कदम यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनीता यांना दोन मुली आहेत. त्या दोघीही विवाहीत असल्याने सध्या त्या वैदुवाडी परिसरात एकट्याच राहतात. दरम्यान, किसन जगताप यांच्याशी त्याची ओळख झाली. जगताप यालाही दोन मुली असून त्यातील एकीचे लग्न झाले आहे. दुसऱ्या मुलीचे लग्न करायचे होते. त्यासाठी जगताप याला पैशाची गरज होती.

किसन जगताप यांनी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पाठिमागील काही दिवसांपूर्वी त्याने एका टीव्ही चॅनलवर 'क्राईम पेट्रोल' ही मालिका पाहिली. या मालिकेतून त्याला सुनाता कदम यांच्या हत्येची कल्पना सूचली. त्यातून जगताप याने सुनीता यांना नऊ एप्रील या दिवशी शितपेयाच्या माध्यमातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे सुनीता यांना भोवळ आली. अर्धवट शुद्धीत असलेल्या सुनीता यांचे डोके भींतीवर आपडून किसन जगताप यांने हत्या केली. सुनीता यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईलची चोरी केली. हा प्रकार चोरीचा असावा यासाठी त्याने घरातील वस्तू आणि कपडेही अस्ताव्यस्त टाकल्या. मात्र पोलिसांनी वेळीच तपास करत हा बनाव उघडा पाडला.