MOVIE THEATRE | (PICTURE COURTESY: INSTAGRAM)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातील थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिनेमागृहं 5 नोव्हेंबर पासून सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली. त्यानंतर मनोरंजन विश्वात आनंदाची लहर पसरली. गेले काही महिने बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरु होणार म्हणून अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र या निर्णयामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्स (Single Screen Theatres) मालकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही, असे दिसून येत आहे. पुण्यातील (Pune) सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद आहेत. सध्याच्या कोविड-19 च्या परिस्थितीत सिंगल स्क्रिन थिएटर्संना पुरेसा वाव मिळणार नाही, ही बाब लक्षात घेऊन मालकांनी थिएटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील लक्ष्मीनारायण थिएटरचे मालक दिलीप बोरावाके यांनी सांगितले की, "सध्या सिंगल स्क्रिन थिएटर्संना पुरेसा वाव मिळणार नसल्याचे मालकांना वाटत आहे. कोविड-19 च्या भीतीपोटी सध्याच्या काळात लोक थिएटर्समध्ये जाणार नाहीत, हे अगदी स्वाभाविक आहे. मल्टिप्लेक्संना देखील सध्या समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्स सुरु करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही."

ANI Tweet:

राज्यातील कोविड-19 ची परिस्थितीत नियंत्रणात येत असल्याची चिन्हं दिसत आहेत. असे जरी असले तरी कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून खबरदारी घेणेही आवश्यक आहे. सध्या राज्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली असून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. (जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता; आरोग्य प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना)

दरम्यान, पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3,41,056 वर पोहचला असून त्यापैकी 3,17,988 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 15,904 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण 7,131 मृतांची नोंद झाली आहे.