जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात (Pune) कोरोना व्हायरसचे पहिले दोन रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यातील आयटी कंपन्यांनी विशेष खबरदारी घेत एक पाऊल उचलले आहे. पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत कर्मचाऱ्यांनी घरुनच काम करावे आणि आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, अशा आशयाचा मेसेज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
दुबईहून परतलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे कालच निदान झाले. या दोघांवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 20-29 फेब्रुवारी दरम्यान हे दाम्पत्य दुबईला गेलं होतं. 1 मार्चला ते पुण्यात परतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघेही सर्दी, ताप, खोकला यामुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर दोघांनाही नायडू रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. (कोरोना वायरस बाधित दोन रुग्ण महाराष्ट्रात आढळले, पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचार सुरु)
कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय यंत्रणा देखील कार्यरत आहेत. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पाळणे महत्त्वाचे आहे. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, हात स्वच्छ धुणे, यांसारख्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1,05,800 हून अधिक झाली आहे. यातील 3,595 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना व्हायरसचा प्रसार जगातील तब्बल 95 देशात झाला आहे.