ATM/ Debit Cards (Photo Credits: Pixabay)

पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची (ATM Card) अदलाबदल करुन नागरिकांची तब्बल 74 हजारांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कदायक बाब म्हणजे, चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून विविध बॅंकांची तब्बल 27 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

शिवनारायण पाझारे (वय, 33) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवनारायण हा पुण्यातील फुरसुंगी परिसरातील आणि मूळ नागपूर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एटीएम कार्डमध्ये एका व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा एटीएम पिन विचारून घेतला. त्यानंतर त्याच्याजवळ असलेले डुप्लिकेट एटीएम कार्ड त्या व्यक्तीला परत दिले. मग काही तासातच आरोपीने संबंधित व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 74 हजार रुपये काढून फरार झाला, अशी तक्रार पोलिसांना 20 जानेवारीला प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्या सांगवी परिसरातील एटीएम सेंटरसमोर त्याला पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रोख रक्कम आणि 27 एटीएम कार्ड सापडल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांत त्याच्यावर सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Bhima Koregaon Case: रोना विल्सन यांच्या लॅपटॉप मधील नरेंद्र मोदी यांच्या हत्येचं 'ते' पत्र प्लांट, अमेरिकन कंपनीचा दावा

पुणे शहर पोलिस गुन्हे शाखेच्या सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या नेतृत्वात आरोपीला अटक केली आहे. सध्या फसवणूकीच्या प्रकारात होणारी वाढ चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.