पुण्यात दिवसाढवळ्या वाळू पुरवठा व्यावसायिकावर भररस्त्यात गोळीबार, गोळी गालाला चाटून गेल्यावर थोडक्यात बचावले
Shooting | Representational Image | (Photo Credits: GoodFreePhotos)

पुण्यात गुन्हेगारीचे (Pune Crime) स्वरुप दिवसेंदिवस गंभीर होत असताना गोळीबाराच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहेत. आज दुपारी पावणे एकच्या सुमारास वाळू पुरवठा व्यावसायिक मयूर हांडे (Mayur Hande) हे हांडेवाडी रस्त्यावरुन जात असताना अचानक श्रीराम चौकात दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी मयूर यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र या गोळीबारात मयूर यांच्या गालाला गोळी चाटून गेल्याने सुदैवाने ते बचावले. यात ते जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वानवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस या पोलिसांचा शोध घेत आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, मयूर हांडे हे हांडेवाडी रस्त्याने जात असताना ही घटना घडली. मयूर यांना काही कळायच्या आत समोरून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र यात ते सुदैवाने बचावले असून या हल्लेखोरांना ताबडतोब तेथून पळ काढला. या हल्ल्यात मयूर हांडे जखमी झाले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेदेखील वाचा- Pune Crime: पुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंड शैलेश घाडगे याची दगडाने ठेचून हत्या

हा हल्ला करण्यामागे काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयाजवळ बिल्डरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर भर दिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गोळीबाराची घटना ही पुणे पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या चौकात, ट्रेजरी कार्यालयासमोर ही घटना घडली. दरम्यान गोळीबारामध्ये 63 वर्षीय  राजेश कानाबर (Rajesh Kanabar) जबर जखमी झाले. त्यांच्यावर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

पुण्यात गेल्या 5-6  दिवसांत घडलेली ही  तिसरी घटना आहे. पुण्यातील गुन्हेगारीचे हे स्वरूप पाहता येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शंका निर्माण झाली आहे.