सध्या भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे आरोग्य सेवा यंत्रणा जवळजवळ मोडकळीस आली आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयातील परिस्थिती पाहता सर्वजणच या विषाणूला घाबरले आहेत. अशात महाराष्ट्रातील पुणे (Pune) शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथे आईच्या मृतदेहाजवळ तिचे दीड वर्षांचे बाळ चक्क दोन दिवस पडून होते, परंतु संसर्ग आणि आजाराच्या भीतीने कोणीही या बाळाजवळ गेले नाही. नंतर पोलिस आले आणि दोन महिला कॉन्स्टेबल्सनी आईची जबाबदारी निभावली.
पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका घरात महिलेचा मृत्यू झाला होता, अशावेळी दोन दिवस तिचे बाळ तिच्या मृतदेहाजवळ भुकेने तळमळत राहिले. हे बाळ ओरडत होते, किंचाळत होते मात्र संसर्गाच्या भीतीने कोणीही या घरी आले नाही. यावरूनच लोकांमधील संवेदनशीलता किती कमी झाली असून माणुसकी विरत चालल्याची जाणीव होते. यासह कोरोनाबद्दलची भीतीही यामधून दिसून येते. घरातून दुर्घंधी यायला सुरुवात झाल्यावर घरमालकाने पोलिसांना फोन केला.
त्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कॉन्स्टेबल सुशीला गभाले आणि रेखा वाजे यांनी या बाळाच्या आईची जबाबदारी पार पडली. सोमवारी मृत महिलेचा मृतदेह सापडला होता पण दोन दिवसांपूर्वीच हा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. महिलेचा दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस भुकेलेला आणि तहानलेला होता. ही महिला मूळ उत्तरप्रदेश येथील आहे. तिचा पती गावी गेला आहे व ती आपल्या दीड वर्षांच्या बाळासोबत घरी होती. या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा असा संशय असल्याने तिच्या घरी कोणी गेले नाही. (हेही वाचा: नागपूरात पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या)
जेव्हा या बाळाला डॉक्टरांना दाखविले तेव्हा मुलाला थोडासा ताप आल्याचे दिसून आले. त्यानंतर बाळाला खायला घालून त्याची कोरोना चाचणी केली, जी नकारात्मक आली आहे. बाळाला सरकारी शिशुगृहात दाखल केले गेले. या महिलेचा शवविच्छेदन अहवाल अजून आला नाही, त्यामुळे तिला कोरोना झाला होता का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सध्या पोलीस या महिलेचा पती परत येण्याची वाट पाहत आहेत.