Pune: रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार केल्याप्रकरणी खाजगी रुग्णालयातील वार्ड बॉयसह दोघांवर गुन्हा दाखल
Remdesivir (Photo Credits: AFP)

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील एका खाजगी हॉस्पिटलचा वार्ड बॉय (Ward Boy) आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर कोविड-19 वरील रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वार्ड बॉय कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना remdesivir औषध चढ्या किंमतीत विकले. विशेष म्हणजे तेव्हा remdesivir औषध शहरातील मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध नव्हते. वार्ड बॉयच्या दोन साथीदारांपैकी एक त्याच हॉस्पिटलचा सुरक्षा रक्षक आहे. या तिघांवर निगडी पोलिस स्थानकात (Nigdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

तक्रारदाराच्या आईला कोरोनाची लागण झाली होती आणि हॉस्पिटलमधून त्यांना remdesivir औषध आणायला सांगितले. परंतु, अनेक मेडिकल स्टोअर्स पालथे घातल्यानंतरही ते औषध कोठेही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तक्रारदाराने औषधं कोठे मिळेल, असे वॉर्ड बॉयला विचारले. त्यानंतर वॉर्डबॉयने अतिरिक्त किंमतीत हे औषध तक्रारदाराला देऊ केले. या प्रकरानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली.

शाहिद शेख (34), विजय रांजणे (35) आणि वैष्णवी टाकोरकर (30) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही पुण्यातील निगडी येथील रहिवासी आहेत. (मुंबई: रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या फार्मा कंपनीच्या दोन वरिष्ठ मॅनेजर्सला अटक)

कोरोना व्हायरसचे संकट ओढावल्यानंतर त्यावरील औषधे, मास्क, सॅनिटायझर्स यांचा काळा  बाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. अशा प्रकराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कोविड-19 संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेतला जात आहे. मात्र अशा चुकीच्या प्रकाराला चाप बसवण्यासाठी त्याविरुद्ध आवाज उठवणे, तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. सध्या पुण्यात 2,70,866 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 2,06,104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 59,332 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 5,429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.