Pune Accident Video: महाराष्ट्रातील पुण्यात अतिवेगाचा कहर पाहायला मिळत आहे. वाघोली परिसरात काल रात्री डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडले. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेत बळी पडलेले सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी होते. हे सर्वजण कामानिमित्त पुण्यात आले होते आणि नेहमीप्रमाणे फूटपाथवर झोपले होते. जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.
फूटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना डंपरने चिरडले
Pune, Maharashtra: A speeding dumper ran over 9 people sleeping on the footpath in Pune's Wagholi area around 12:30 AM. Three people died, and six others were injured. The victims, laborers from Amravati, were admitted to Sassoon Hospital. The dumper driver has been arrested, and… pic.twitter.com/dSlQdOg1eK
— IANS (@ians_india) December 23, 2024
डंपर चालकाला अटक
अपघातानंतर लगेचच पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण चालकाचा निष्काळजीपणा आणि जास्त वेग असू शकतो. या प्रकरणाचा तपास सुरू असून, चालकाची चौकशी करण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. फूटपाथवर झोपणाऱ्या गरीब मजुरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक लोकांची प्रतिक्रिया
असे अपघात दरवर्षी घडतात, मात्र कारवाई होत नसल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. या अपघातामुळे पुन्हा एकदा फूटपाथवर झोपणाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात हजारो मजुरांना फूटपाथवर झोपावे लागत आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलतील, अशी आशा आहे.