पुणे रेल्वेस्थानकावर (Pune Railway Station) अवैधरित्या पिस्तुल आणि काडतुसं बाळगल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी 24 जानेवारीला गुजरात मधील एका व्यावसायिकाला अटक केली आहे. संशयास्पद हालचाल जाणवल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेतली, चौकशी केली. त्यावेळी त्या व्यक्तीकडे परदेशी बनावटीचं पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसं आढळली. सोबतच साडेतीन लाखांचा ऐवज देखील जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान अटक केलेल्या व्यक्तीचं नाव अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय आहे. 47 वर्षीय अनिलकुमार हा सुरतचा रहिवासी आहे. तो सुरत वरून बंदुक घेऊन आल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडे असलेले हे अवैध बंदुक का आणि कशासाठी होतं याचा तपास सुरू आहे. विनापरवाना पिस्तूल आढळल्याने सध्या त्याला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. अनिल कुमार याने आपल्या जवळील पिस्तुल ही इंग्लंडच्या बनावटीची असल्याचं तसेच भोपाळ मधून एका महिलेकडून घेतल्याचं म्हटलं आहे.
पुणे रेल्वे स्थानकामध्ये सकाळी 10.55 च्या सुमारास स्टेशनच्या मुख्य गेटवर रेल्वे पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याची हालचाल पाहून त्याला अडवलं. ताब्यात घेऊन चौकशी केली. पुढे झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ 1 पिस्तुल, सहा जीवंत काडतुसं आणि 1 टॅब व 3 मोबाईल सापडले. सोबतच काही सोन्याचे साहित्यही सापडलं आहे.