आयर्लंडच्या पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी भेट; गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत (Video)
Leo Varadkar (Photo Credit: PTI)

2 जून, 2017 रोजी मुळचे मालवण येथील लिओ वराडकर (Leo Varadkar) यांची आयर्लंडच्या (Ireland) पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. त्यानंतर हे नाव भारतात, मुख्यत्वे महाराष्ट्रात फारच चर्चेत होते. आता डॉ. लिओ वराडकर आपल्या मूळ गावाच्या दौऱ्यावर भारतात आले आहेत. आज वराडकर यांचे आपल्या मूळ गावी मालवण तालुक्यातील वराडमध्ये आगमन झाले.

गावातील लोकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. लिओ वराडकर हे Taoiseach म्हणून कार्यरत आहेत, म्हणजेच ते पंतप्रधान आणि आयर्लंडचे सरकार प्रमुख आहेत. ते आयर्लंडमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या फाईन गेलचे (Fine Gael) नेते देखील आहेत.

पहा व्हिडीओ -

वराडकर यांचा हा अगदीच खासगी दौरा असल्याने याची माहिती जास्त कुणाला नव्हती. डॉ. लिओ यांच्यासोबत वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले उपस्थित होते. गाडीतून उतरतानाच अगदी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिलांनी आरती ओवाळून त्यांना घरात घेतले. यावेळी त्यांनी अस्सल मालवणी खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. (हेही वाचा: मालवण मध्ये 9 पर्यटकांना वादळी वाऱ्याचा फटका; एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू तर एक गंभीर जखमी)

याआधी 5 वेळा लिओ भारतात आले आहेत, मात्र आपल्या मूळ गावी वराडमध्ये ते पहिल्यांदाच आले. लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले व ते तिथेच स्थायिक झाले. मात्र हे कुटुंब आपल्या मराठी मातीतील संस्कार काही विसरले नाही, याची प्रचीते आज आली. दरम्यान, लिओ यांनी वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. पुढे त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवले. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. त्यानंतर 2017 साली ते आयर्लंडचे पंतप्रधान झाले.