PM Narendra Modi inaugurates Nagpur Metro (Photo Credits: ANI)

नागपूरवासियांच्या बहुप्रतिक्षित 'नागपूर मेट्रो' (Nagpur Metro) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज हिरवा कंदिल दाखवला. 8 मार्च म्हणजे उद्यापासून नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. दिल्ली येथून खास व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. नागपूर मेट्रोमधून पहिला प्रवास करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि केन्द्रीय राज्य गृह निर्माण मंत्री हरदीप सिंह (Hardeep Singh) यांना मिळाली. उद्यापासून धावणार्‍या नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांना पहिल्या दिवशी मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नागपूर मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी नरेंद्र मोदी यांना हा क्षण माझ्यासाठी डबल आनंदाचा असल्याचं म्हटलं आहे. नागपूर मेट्रोप्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही माझ्याहस्ते होणं हा माझ्यासाठी डबल आनंदाचा क्षण आहे असे मोदी म्हणाले. नागपूर मेट्रो ही भारतातील ग्रीन मेट्रो प्रोजेक्टपैकी एक आहे.

नागपूर मेट्रो ही चार वर्षात प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. ही मेट्रो 13.5 किलोमीटरच्या परिसरात धावणार असून तिचा कमाल वेग प्रतितास 40 किमी असणार आहे. 40 स्टेशन्स आणि 2 डेपोंच्या दरम्यान नागपूर मेट्रो धावणार आहे. या प्रोजेक्टसाठी सुमारे 8680 करोड रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.