राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा केली. हा पाठिंबा आम्ही दबावातून नव्हे तर उत्स्फूर्तपणे दिला आहे. राज्यातील एकूण राजकीय स्थिती ती पाहता भाजप (BJP) उमेदवार म्हणून त्यांना आम्ही विरोध करायला हवा होता. परंतू, आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे नाही आहोत. देशातील अदिवासी महिला प्रथमच इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचते आहे. त्यामुळे शिवसेनेतील आदिवासी नेत्यांच्या मागणीचा सन्मान करत आम्ही हा निर्णय घेतला आहे. या आधीही शिवसेनेने पक्ष, आघाडी आणि इतर धोरणांपलीकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भूमिका बजावली आहे. आम्ही प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता, अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका सुरु आहेत. कालसुद्धा (11 जुलै) शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत माझ्यावर कोणीही दबाव आणला नाही. उलट खासदारांनी मला सांगितले की, आपण जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य असेल, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केवळ शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आणि ते पत्रकार परिषदेतून निघून गेले. पत्रकारांनी विचारलेल्या इतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. आपली भेट घेण्यासाठी काही लोक आले आहेत. त्यांना आपण आगोदरच वेळ दिला असल्याने मी जास्त बोलणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Anant Geete on Shiv Sena Rebel: शिवसेना बंडखोरांच्या गळ्यात पट्टा,साखळी भाजपाच्या हातात, अनंत गीते यांचे टिकास्त्र; उद्धव ठाकरे यांनाही सल्ला)
दरम्यान, उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून निघून गेल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. या सरकारला विशेष असे कोणतेही अधिकार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सचिव देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिले आहे. या पत्रात राज्यपालांना कळविण्यात आले आहे की, शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला शपथ देता येणार नाही असे म्हटले आहे. मुळात राज्यात सत्तेत आलेले शिंद सरकार हेच बेकायदेशीर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.