Abhijit Bichukale | (Photo Credit - Twitter)

राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक (Presidential Election 2022) तोंडावर आली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधक असे राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. अशातच विविध निवडणुका लढवणारे सेलिब्रेटी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असेलेल बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हेदेखील या निवडणुकीत नशीब आजमवू पाहात आहेत. अभिजीत बिचुकले यांनी दावा केला आहे की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपण एन्ट्री घेणार असून त्यासाठी आपली रणनिती तयार आहे. आपण देशभरातील खासदारांना संपर्क करत आहोत. अभिजीत बिचुकले यांची खासीयत अशी की त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार, खासदार आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचाही (President Election 2022) समावेश आहे. अर्थात आजवर त्यांना कोणत्याच निवडणुकीत यश आले नाही. हा भाग वेगळा.

अभिजीत बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, राष्ट्रपती पदासाठी मी इच्छुक आहे. त्यासाठी माझी रणनिती तयार आहे. आपण पाहिले तर आपल्या न्यायपालिका, केंद्रातील विविध निर्णय, देशातील प्रमुख यंत्रणा या सर्वांवरच राष्ट्रपतींचा मोठा दबाव असतो. त्यामुळे या पदावर असणार व्यक्ती सक्षम असायला हवा. राष्ट्रपतींनी देशासाठी अनेक गोष्टी करण्यची आवश्यकता असते. मात्र, ते त्या गोष्टी करताना अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे आपणास संधी मिळाली तर आपण त्या गोष्टी नक्की करु. माझ्या डावपेचांना नक्की यश येईल, असा दावाही अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवार यांचा राष्ट्रपती पदासाठी अनुभव योग्य, भाजपने रबर स्ट्रम्प निवडू नये - संजय राऊत)

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज 100 टक्के, दाखल होणार, असे बिचुकले यांनी म्हटले आहे. त्यासाठी सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. अभिजीत बिचुकले यांनी पुढे दावा केला आहे की, आपण निर्व्यसनी, प्रामाणिक आणि सुशिक्षित आहोत. आपल्याला कायद्याचीही चांगली माहिती आहे. त्यामुळे आपणास अनुमेदन मिळावे यासाठी आपण पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी बोलत आहे. आमदार खासदारांनी जर सह्या दिल्या तर सगळे जमून येईल, असेही बिचुकले यांनी म्हटले आहे.