Arvind Sawant | Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री पद आणि समसमान सत्तावाटप या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप (BJP-Shiv Sena) यांच्यातील सत्तासंघर्ष टीपेला पोहोचल्यानंतर खासदार अरविंद सांवत (Arvind Sawant) यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना (Shiv Sena) या घटक पक्षाकडे असलेले हे एकमेव मंत्रिपद. दरम्यान, अरविंद सांवत यांनी आपल्या अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाचा कार्यभार मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार जावडेकर यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर या पदाचा कार्यभार जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला. राष्ट्रपती भवनेने एका प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच हा कार्यभार जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे.

निवडणूकपूर्व युती करुन विधानसभा निडणुकीस शिवसेना-भाजप युतीद्वारे सामोरे गेले होते. 24 ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसेना-भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, मुख्यमंत्री पद आणि समसमान जागावाटप या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला आणि सरकारस्थापनेत अडथळा आला. त्यानंतर पक्षादेश प्रमाण मानत अरविंद सांवंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (हेही वाचा, 'हम होंगे कामयाब..जरूर होंगे' म्हणत संजय राऊत यांचे लीलावती रुग्णालयातून ट्विट)

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप 105 तर शिवसेना 56 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांना मिळून 161 जागा मिळाल्या. एकूण सदस्यसंख्या 288 असलेल्या विधानसभा निवडणुकीत 145 हा जादूई आकडा आहे. मात्र, सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन संघर्ष टोकाला गेला आणि या दोन्ही पक्षात मतभेद झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 54 तर काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत.