नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर 'बेस्ट कामगारां'च्या बेमुदत उपोषणाला स्थगिती; गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलन सुरु
नारायणे राणे व बेस्ट बस (संग्रहित संपादित प्रतिमा)

बेस्ट कामगारांचे (BEST Employees) वेतनवाढ, सातवा वेतन आयोग लागू करावा अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण (Hunger Strike) सुरु होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांची तब्येत बिघडली. त्यानंतर आता हे बेमुदत उपोषण गणेशोत्सवापर्यंत (Ganeshotsav) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गणपतीच्या सणानंतर हे आंदोलन पुन्हा सुरु होण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मध्यस्तीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गणेशोत्सव तोंडावर आला असताना बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. वेतनवाढ, सातवा वेतन आयोग लागू करा, बेस्टचा 2016 पासून रखडलेला वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले होते. या दरम्यान कामगार नेते शशांक राव यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे यांनी तात्काळ वडाळा डेपोत जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. (हेही वाचा: BEST Employees Hunger Strike Day 3: बेस्ट कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली; KEM रूग्णालयात दाखल)

‘चार दिवसात गणपतीचा उत्सव सुरु होईल. या काळात बेस्टचे अनेक कामगार कोकणात त्यांच्या गावी जातात. सणाची तयारी करण्यास त्यांना वेळ हवा, अशा काळात उपोषण करणे योग्य नाही. हवे तर तुम्ही गणेशोत्सवानंतर उपोषण पुन्हा सुरु करा.’ अशा शब्दांत नारायण राणे यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. गणेशोत्सवानंतर मात्र जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे.