पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत भीषण अपघात केला होता. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. 19 मेच्या पहाटे ही घटना घडली. या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.  या प्रकरणात सुरुवातीला मुलाला जामीन मिळाला होता. यानंतर आता पर्यंत या प्रकरणात अनेक नवेनवे खुलासे पहायला मिळाले.  या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय आरोप होत आहेत. आता या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांचं महाबळेश्वर येथील हॉटेल पाडण्यात आलं आहे.  काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी याबाबत पोस्ट केली आहे.

पाहा पोस्ट -

याबाबत रविंद धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की "उशिरा आलेले शहाणपण.. पुण्यातील कल्याणीनगर दुर्घटनेतील आरोपी मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचे महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आज हे प्रकरण प्रकाश झोतात आल्यावर प्रशासन कारवाई करत आहे, याचा अर्थ इतके दिवस हे सगळं माहीत असूनही प्रशासन गप्प होते. अगरवालचे अनेक अवैध धंदे, हत्या, फसवणुक, दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी."  अशी मागणी करण्यात आली आहे.