Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

Maharashtra Police Recruitment 2024 : महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार पदांसाठी उद्या म्हणजेच 19 जूनपासून पोलीस भरती (Maharashtra Police Bharati)होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती करणं शक्य नव्हतं. मात्र आता 19 जून पासून भरती प्रक्रिया होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार पदासांठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज आले आहेत. तुरूंग विभागात शिपाई पदाच्या1800 जागांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत. शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज आले आहेत.

रायगड जिल्हा-

रायगड पोलीस दलात 422 रिक्तपदांसाठी 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज आले आहेत. सलग 25 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

पुणे जिल्हा-

पुण्यात 202 पदांसाठी 21 हजार अर्ज दाखल झाले आहेत. येरवडा कारागृहात देखील 513 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

धाराशिव जिल्हा-

धाराशिव जिल्ह्यात 143 पदासाठी भरती होणार आहे. शिपायाच्या 99 जागा तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होते आहे. तेथे चालक पदासाठी साडे चार हजार अर्ज दाखल झाले आहेत. तर पोलीस शिपाई पदासाठी साडे तीन हजार अर्ज आले आहेत.

कोल्हापूर जिल्हा-

कोल्हापूरमध्ये पोलीस परेड ग्राऊंडवर भरती प्रक्रिया चालणार आहे. शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याबाबतची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

चंद्रपूर जिल्हा-

चंद्रपुमध्ये 19 जूनपासून पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलय. शिपाई आणि बँड्सन या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 22 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे.