मुंबई पोलीस भरती परीक्षेला (Mumbai Police Recruitement Test) डमी उमेदवार बसल्याप्रकरणी बीड (Beed) येथील एका प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गणेश पवार, 25 हा किमान तीन उमेदवारांच्या ऐवजी चाचणीसाठी हजर राहिल्याचा आरोप आहे. त्याला ग्राउंड चाचण्यांमध्ये 50 पैकी 49 गुण मिळाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल केले असून पवारसह 11 जणांना अटक केली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेल्या डमी उमेदवाराच्या पहिल्या प्रकरणात पवार यांचे नाव समोर आले होते.
त्यानंतर आणखी दोन प्रकरणात हा डमी उमेदवार म्हणून हजर झाला होता, मात्र त्यावेळी तो सापडला नाही. आता पोलिसांनी त्याला सोमवारी जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार याने रवी शेळकेसोबत बीड येथे प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रवीचा मृत्यू झाला. गणेश पवार हा याठिकाणी एक प्रशिक्षक आहे आणि उमेदवारांना मैदानी चाचणीबद्दल तो प्रशिक्षण देतो. यामध्ये उमेदवारांना कसे धावायचे आणि कसे चांगले गुण मिळवायचे याबद्दल शिकवले जाते.
ज्या उमेदवारांना मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवण्याचा आत्मविश्वास नसतो, त्यांच्या जागी गणेश चाचण्यांसाठी हजार राहतो. यासाठी तो 3 लाख रुपये आकारतो. ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षेत 50 पैकी 40-42 गुण मिळवले आणि ग्राउंड टेस्टमध्ये चांगले गुण मिळवण्याची खात्री नाही, अशा लोकांसाठी गणेश डमी उमेदवार म्हणून हजर राहत होता. तीन उमेदवारांऐवजी पवार अशा चाचण्यांना हजार राहिला आणि त्याने 50 पैकी 49 गुण मिळवले. (हेही वाचा: औरंगाबाद मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विकेंडलाही सुरू राहणार शाळा)
भोईवाडा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांनी सांगितले की, आम्ही पवार याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या 1076 कॉन्स्टेबल पदासाठी 14 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा तर डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ग्राऊंड घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी 1.09 लाख उमेदवार उपस्थित होते त्यापैकी टॉप 10,760 उमेदवारांना ग्राउंड टेस्टसाठी बोलावण्यात आले होते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी लेखी चाचणी आणि ग्राउंड चाचण्यांचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते. 1076 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर, एक विशेष टीम तयार करण्यात आली, ज्यांनी सर्व अंतिम उमेदवारांची छाननी केली आणि जे संशयास्पद आढळले त्यांना बोलावले.
पोलिसांनी अशा तरुणांना फसवणूक आणि गुन्हेगारी कट प्रकरणी अटक केली. बाळनाथ पवार (30), सतीश मोरे (22), भगवान टकले (24), विकास साळुंखे (28), कुंडलिक शिंदे (25), प्रवीण शिंदे (32), ज्ञानेश्वर घोडके (24) आणि आकाश कव्हळे (23) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दोन डमी उमेदवारांसह अटक करण्यात आली आहे. सर्व उमेदवार आणि डमी हे जालना, बीड, औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, असे पोलिसांनी सांगितले.