Girlfriend Boyfriend Argument: प्रेयसीसोबत झालेल्या कथीत भांडणातून मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील 27 वर्षीय पोलीस शिपायाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. इंद्रजीत साळुंखे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्याने पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या अभ्यासिकेतच गळफास घेतला आहे. गळफास घेण्यापूर्वी आपण गळफास घेत असल्याचे छायाचित्रही त्याने आपल्या प्रेयसीला पाठवले आहे. वरळी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपमृत्यू अशी नोंद दप्तरी केली आहे. इंद्रजीत हा स्थानिक सशस्त्र पोलीस दलात भोईवाडा येथे सेवेत होता. त्याचे एका 23 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही कारणांवरुन झालेल्या भांडणातून त्याने हे पाऊल उचलले.
अभ्यासिकेच्या खिडकीला दोरी बांधून गळफास
वरळी येथील पोलीस तरण तलावाशेजारीच अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेच्या खिडकीला दोरी बांधून इंद्रजीतने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले. ही घटना रविवारी (19 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तासात पुढे आलेली माहिती अशी की, इंद्रजित आणि त्याची प्रेयसी यांच्यात वरळी सी फेस येथे भेट झाली. या वेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यावर इंद्रजितने तिला दादर रेल्वे स्थानकावर सोडले आणि तो परतला. दरम्यान, प्रेयसिने त्याचा क्रमांक ब्लॉक केल्याचे त्याच्या लक्षात आले.
प्रेयसीला फोटो पाठवून आत्महत्या
दरम्यान, पोलीस तपासात पुढे आले की, त्याने गळफास घेत असतानाचे एक छायाचित्र त्याच्या प्रेयसीला पाठवले होते. तसेच, त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा संदेशही तिला पाठवला होता. त्यानंतर त्याने खरोखरच गळफास घेतला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुकु केला आहे. कुटुंबीयांनी आपल्या जबाबात पोलिसांना माहिती देताना सांगितले की, आपला कोणावरही संशय किंवा आरोप नाही. त्यामुळे या आत्महत्येला आणखी किनार आहे का याचा पोलीस तपास करत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी अथवा कारणांबाबत माहिती देणारा सकृतदर्शनी कोणताही पुरावा पुढे आला नाही.
एक्सपोस्ट
Mumbai, Maharashtra: A police constable, Indrajeet Salunkhe posted in the Local Arms Department died by suicide yesterday around 10 pm in the Worli area in Mumbai. The police have sent the body for post mortem and further investigation is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) November 20, 2023
अलिकडील काही काळांमध्ये तरुणांमध्ये किरकोळ कारणांवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या धक्कादायक प्रमाणाबद्दल सामाजिक घटना, घडामोडींचे अभ्यासक सातत्याने चिंता व्यक्त करत आहेत. खास करुन कोरोना महामारीमध्ये अनुभवलेल्या लॉकडाऊन नंतर सामाजिक स्थित्यांतर मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यातून जोडप्यांमधील कलह आणि अगदीच किरकोळ कारणामुळे आयुष्य संपवण्याच्या घटना तरुणाईमध्ये वाढल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी तरुणाईचे सामाजिक पातळीवर समुपदेशन करण्यात यावे, असा सल्लाही हे अभ्यासक देतात.