येणारी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) ही देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी फार महत्वाची निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, त्यानुसार प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातून फोडला होता, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठून सुरुवात करतील अशी उत्सुकता लागली होती. तर नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या प्रचार सभेचा नारळ महाराष्ट्रातून फोडणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे शहर म्हणून ओळखले गेलेले मात्र आता भाजपकडे असलेल्या वर्धा शहरात नरेंद्र मोदी यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. ही माहिती भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी दिली.
वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यामध्ये ते सेवाग्रामला भेट देणार आहेत. प्रचाराकरिता 50 हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या समवेत अनेक भाजप नेत्यांनी नावापुढे Chowkidar जोडत ट्विटरवरील नावात केला बदल)
वर्ध्याचा भाजप उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे त्या उमेदवाराची घोषणा करता येणार नाही असे सुधीर दिवे यांनी सांगितले आहे. तर वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.