Narendra Modi | (Photo Credit: ANII)

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांचे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महाराष्ट्रात आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवारी) एकूण सहा जाहीर सभा होणार आहेत. माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर, कराड आणि पुणे येथे सभांना संबोधित करणार आहेत. मंगळवारी ते माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभांना संबोधित करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन दिवसांत राज्यात सहा सभा घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. ज्यामध्ये ते आज तीन सभा आणि उद्या तीन सभा घेणार आहेत.

असा असेल कार्यक्रम-

सोमवार (29 एप्रिल 2024)-

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची प्रचार सभा दुपारी 1.30 वाजता होम ग्राऊंडवर, उदयनराजे भोसले यांची कराड येथे प्रचार सभा दुपारी 3:45 वाजता, तर पुण्याची सभा 5:45 वाजता रेसकोर्स मैदानावर होणार आहे. पुण्यातील ही सभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी होणार आहे.

मंगळवार 30 एप्रिल 2024)-

मंगळवारी दुपारी 11.45 वाजता माढा येथील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरसमध्ये, त्यानंतर धाराशिवमध्ये दुपारी 1.30 वाजता राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी प्रचारसभा होणार आहे. दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांच्या जाहीर सभेला संबोधित करतील. (हेही वाचा: Sharad Pawar Visits Pandharpur Vitthal Rukmini Mandir: शरद पवार पोहचले पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात; घेतले मनोभावे दर्शन)

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींच्या पुण्यातील सभेला 2 लाख लोक जमतील असा दावा केला आहे.  या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमितही यावेळी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह कर्नाटकातील बागलकोट येथेही सभा घेणार आहेत. यापूर्वी 28 एप्रिल (रविवार) देखील मोदींनी कर्नाटकातील बेळगावी, उत्तरा कन्नड, दावणगिरी आणि बेल्लारी येथे चार सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 आणि कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत.