Petrol/ Diesel Car(Photo Credits: PTI)

सातारा (Satara) जिल्ह्यातील सासवड (Saswad) गाव परिसरात एक घडलेल्या घटनेने सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही अचंबीत केले. पाण्याच्या विहिरीत चक्क पेट्रोल (Petrol Well) सापडले. ज्या शेतकऱ्यांनी आजवर परिसरातील विहिरीमध्ये केवळ पाणीच पाहिले होते. त्याच विहीरी आज त्यांना पेट्रोलने तडूंब भरलेल्या पाहायला मिळाले. धक्कादायक असे की, केवळ विहीरीतच नव्हे तर चक्क जमीनितही पेट्रोल पसरले. त्यामळे इंधनाच्या धगीने पिकंही करपून गेली. घडल्या प्रकाराची पोलिसांनीही दखल घेऊन कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण घ्या जाणून.

सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan Taluka) तालुक्यात येत असलेल्या सासवड या गावातील परिसरात शेतकऱ्याच्या शेताखालून पेट्रोलची पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन हिंदुस्थान पेट्रोलियम ( Hindustan Petroleum) या कंपनीची आहे. पेट्रोलचे दर एका बाजूला गगनाला भिडले आहेत. शंभरीपार गेलेल्या इंधन दरांमुळे सर्वासामान्य मेटाकुटीला आले आहेत. अशा वेळी काही चोरट्यांची नजर या पाईपलाईनवर पडली. त्यांनी या पाईपलाईनमधून पेट्रोलची चोरी करण्याचे ठरवले. आणि योजना आखली. (हेही वाचा, महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल किंमती )

चोरट्यांनी योजना आखून ही पाईपलाईन फोडली. त्यातून त्यांनी पेट्रोल चोरले. परंतू, फोटलेली पाईपलाईन पुन्हा जोडणे काही त्यांना जमले नाही. त्यामुळे पेट्रोल गळती झाली. हे पेट्रोल बाजूला असलेल्या दोन विहीरी आणि जमीनीत पसरले. पेट्रोलचा वास आजूबाजूला पसरला. शेतकऱ्यांनी उत्सुकतेने पुढे जाऊन पाहिले तर सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि घटनेचा भांडाफोड झाला. ही घटना साधारण एक आठवड्यापूर्वी घडली. परंतू, हे प्रकरण अत्यंत संवेदनशिल आणि सुरक्षेच्या दृष्टीने नाजूक असल्याने याबाबत वाच्यता करण्यात आली नसल्याचे समजते.

कशी आहे पाईपलाईन

प्राप्त माहितीनुसार, मुंबई ते सोलापूर अशी हिंदुस्तान पेट्रोल लिमिटेडने पाईपलाईन केली आहे. ही पाईपलाईन फलटण तालुक्यातील सासवड येथील आदर्की परिसरातील डोंगराळ भागातून जाते. अज्ञात चोरट्यांनी या पाईपलाईनला ड्रील करुन पाईप जोडली आणि पेट्रोल बाहेर काढले. मात्र, ही पाईपलाईन चोरट्यांना पुन्हा जोडण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.