
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने आज पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्येही घट पहायला मिळाली आहे. आज सकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या पेट्रोलच्या सुधारित दरानुसार मुंबई मध्ये पेट्रोलचा दर 06.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. केंद्र सरकारने 21 मे ला उत्पादन शुल्कात कपात करून पेट्रोलचे दर 8 रुपये आणि डिझेलच्या दर 6 रुपयांनी कमी केले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतरानंतर शिंदे सरकारकडून जुलै महिन्यात देखील पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये कपात जाहीर करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 93.01 डॉलरवर पोहचला आहे. त्याचा परिणाम आता इंधनाच्या किंमतीवर झाला आहे. काल सरकार कडून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही मोठी कपात जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता सणासुदीच्या काळात आणि महागाईने होरपळून निघालेल्या जनसामान्यांना इंधनदरांतील ही कपात दिलासादायक आहे. इथे जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरात आजच्या पेट्रोल, डिझेल च्या किंमती!
दरम्यान इंधनाच्या दरांवर प्रत्येक ठिकाणी अन्य टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज याच्या आकडेमोडीवरून अंतिम किंमत ठरवली जाते. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक आहे. आपल्या तेलाच्या गरजेपैकी 85% तेल आपण परदेशी बाजारपेठांमधून विकत घेतो. दरम्यान आपल्या स्थानिक डिझेल आणि पेट्रोलच्या किमती या दोन इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमतींशी निगडीत आहेत
आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर आपण SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑयल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून तो 9224992249 क्रमांकावर पाठवायचा आहे.त्यानंतर आपल्याला काहीच वेळात शहरांतील दर पाहायला मिळू शकतात.