Providing Chits to SSC Students | (Photo Credits: ANI)

Maharashtra SSC Exam 2020: महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेला काल (3 मार्च) पासून सुरुवात झाली. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार, कॉपी प्रकरणं यांना आळा घालण्यासाठी बोर्डाकडून 273 भरारी पथकं आणि विशेष महिला भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच सर्व परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतकी चोख व्यवस्था करुनही यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव (Mahagaon) येथे जिल्हा परीषदेच्या शाळेत (Zila Parishad School) कॉपी पुरवण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. लोकं चक्क भिंतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. काल जळगाव येथे मराठी विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (SSC Board Exam 2020: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी 'या' महत्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर)

ANI Tweet:

गेल्या वर्षी दहावीच्या निकालात घट झाल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जाणार आहेत. तसंच परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळावा म्हणून दोन पेपर्समध्ये पुरेसा खंड ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा विचार करुनच बोर्डाकडून हे निर्णय घेण्यात आले असूनही अशा प्रकारचे गैरप्रकार समोर येत आहेत.

यंदा दहावीच्या परीक्षेस राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसणार आहेत.  9 विभागीय मंडळातून घेतल्या जाणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्यात तब्बल 4979 परीक्षा केंद्र सज्ज आहेत.