Dr. Payal Tadvi Suicide Case: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील 3 आरोपी डॉक्टरांना सशर्त जामीन मंजूर; मात्र मुंबई बाहेर जाण्यास मनाई
Payal Tadvi Suicide Case (File Image)

मुंबई: नायर रुग्णालयातील (Nair Hospital)  रहिवाशी डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. पायल हिला जातीय शेरेबाजी करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याभक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) या तीन सिनियर डॉक्टर्संना अटक करण्यात आली होती मात्र आज या तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला आहे.

खटला संपेपर्यंत या डॉक्टरांना मुंबईबाहेर जाण्यापासून मनाई करण्यात आली आहे. तसेच एक दिवस आड तपासयंत्रणेपुढे हजेरी लावणं अनिवार्य असेल . या तिन्ही महिला डॉक्टरांचे वैद्यकिय परवाने तूर्तास  स्थगित करण्यात आले असून नायर रूग्णालय आणि आग्रीपाडा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. Payal Tadvi Suicide Case : तिन्ही सिनियर डॉक्टरांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीचं होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

ANI ट्विट

यापूर्वी पोलिसांच्या तपासात पायल तडवीने लिहिलेली सुसाईट नोट 3 आरोपींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. या सुसाईट नोटचा स्क्रिनशॉट फोनमधून रिकव्हर करण्यात फॉरेंसिक विभागाला यश आल्याची माहिती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली होती. ज्यानंतर विशेष एससी- एसटी कोर्टाने यापूर्वी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.तर उच्च न्यायालयात याप्रकरणी 30 जुलैला होणारी सुनावणी एक आठवडा पुढे ढकलण्यात आली होती.

नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टरांवर लावून पायलच्या कुटुंबाने नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी व या तीनही डॉक्टरांचे परवाने जप्त करावे अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती.