Patra Chawl Land Scam Case: संजय राऊतांची ईडी कोठडी संपली; जेल की बेल च्या निर्णयाकडे लक्ष
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ता संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) कोठडी आज (4 ऑगस्ट) संपत आहे. पत्राचाळ गैर व्यवहार (Patrachawl Land Scam) प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना आता आज जामीन मिळणार की जेल मध्येच त्यांचा मुक्काम वाढणार यासाठी त्यांना कोर्टात दाखल केले जाणार आहे.

ईडी कडून पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अजून 2 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीनंतर काही कागदपत्रं हाती आली आहेत तसेच राऊतांनी 3 कोटी रोख देऊन अलिबाग मध्ये 10 प्लॉट विकत घेतले आहेत. HDIL च्या अकाऊंटचाही त्यामध्ये जबाब नोंदवला असल्याची माहिती आहे. प्रविण राऊत यांच्याकडूनही त्यांना पैसे मिळत असल्याचा दावा ईडीने केला आहे. यामधूनच संजय राऊतांनी मुंबई, अलिबाग मध्ये घरं विकत घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात सुरुवातीला प्रविण राऊत यांचं नाव समोर आलं होतं. आता संजय राऊतांनाही प्रविण राऊत यांना मदत केल्याचा दावा ईडीने केला आहे. खरे आरोपी बाजूला सारून अन्य लोकांनाच आरोपी केल्याचं ईडीचं म्हणणं आहे.  नक्की वाचा: Patra Chawl Land Scam Case: ज्या पत्राचाळ प्रकरणामुळे Sanjay Raut, ED च्या रडार वर आले ते नेमके काय? 

संजय राऊत यांना पत्राचाळ जमिन गैर व्यवहार प्रकरणी यापूर्वी 3 समन्स ईडीने बजावले त्यापैकी दोनदा ते गैर हजर राहिले आणि अखेर रविवार 31 जुलै दिवशी सकाळी  7 वाजता ईडी त्यांच्या घरी पोहचली आणि 9 तासांच्या कारवाई नंतर संजय राऊतांना ताब्यात घेऊन ते ईडी कार्यालयात पोहचले आणि रात्री उशिरा अटकेची कारवाई पूर्ण केली.