रत्नागिरी: पाच दिवसांच्या गणपतीला मनोभावे निरोप दिल्यानंतर कोकणातील चाकरमानी पुन्हा मुंबईला परतत आहे. त्यामुळे अर्थातच कोकण वाहिणी असलेल्या रेल्वेवर मोठा ताण पहायला मिळतो आहे. प्रवासी संख्येत झालेली मोठी वाढ आणि तुलनेत गाड्यांची संख्या कमी यामुळे गोंधळ पहायला मिळत आहे. रत्नागिरी स्थानकातही असाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांनी दादर पॅसेंजर रेल्वेस्थानकातच रोखल्याचा प्रकार रत्नागिरी येथे घडला.

दादर पॅसेंजर सिंधुदुर्गातून येतानाच तुडूंब भरून आली. त्यामुळे रत्नागिरीत प्रवाशांना गाडीत चढायलाच मिळाले नाही. परिणामी प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यातच जे डबे रत्नागिरीतील प्रवाशांसाठी राखीव ठेवले होते तेही डबे सिंधुदुर्गातूनच प्रवाशांनी भरुन आले होते. त्यामुळे या संतपात आणखीच भर पडली. त्यामुळे रत्नागिरी प्रवाशांनी पॅसेंजर रोखून धरली. रत्नागिरीच्या डब्यात सिंधुदुर्गातून बसून आलेल्या प्रवाशांना खाली उतरवावे अशी रत्नागिरीतल प्रवाशांची मागणी होती.

प्रवाशांचा रुद्रावतार पाहून रेल्वे व्यवस्थापनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर रेल्वे पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून, प्रवाशांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. तसेच, रोखून धरलेली पॅसेंजर सोडा, अन्यथा कायदेशीर कारवाई करु असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.