पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचे मुंबई येथून अपहरण; बेशुध्द करून अहमदनगर जिल्ह्यात दिले सोडून
Parth Pawar (Photo Credit; Facebook)

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच शरद पवार यांचे नातू पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ड्रायव्हरचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. मनोज सातपुते असे या ड्रायव्हरचे नाव असून, त्याचे कुलाबा इथून अपहरण करून पारनेर तालुक्यातील सुपा येथे सोडून दिले गेले. मनोज जेव्हा सापडला तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पवार कुटुंबीय मुंबई आणि पुणे पोलिसांच्या संपर्कात आहेत. सध्या मनोज सातपुते शिक्रापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘तू पार्थ पवार यांचा ड्रायव्हर आहे का?’ अशी विचारणा करून मनोज यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे सोडण्यात आले. शुद्धीवर आल्यावर स्वतः मनोज यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस मिळालेय माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा: ट्रोलर्सना पार्थ पवार याचं प्रत्युत्तर, 'बोलण्यावर नाही माझ्या कामावर लक्ष द्या')

अपहरणकर्ते लाल रंगाच्या ओमनी गाडीतून आले होते. त्यांनी मनोज यांचे मुंबईत कुलाबा बेस्ट डेपो इथून अपहरण केले. मनोज यांच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमादेखील आहेत. मात्र अपहरण केल्यानंतर त्यांना बेशुद्ध केल्याने काहीच आठवत नाही. मनोज सातपुते यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच गुन्हा कुलाबा पोलिसांकेडे वर्ग करण्यात आला आहे.