प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : VideoBlocks)

मातृत्व... स्त्रीच्या जीवनातील म्हटले तर सर्वात आनंदी काळ, आणि म्हटले तर सर्वात कठीन. एका जीवाला आपल्या पोटात वाढवणे ही काही सोपी गोष्ट नाही. अशावेळी तिच्या काळजीसोबतच तिच्या सर्व गरजाही पूर्ण करणे आवश्यक असते. जेव्हा स्त्री गरोदर होते तेव्हा ती एकटी गरोदर नसते, तर होणारा पिताही तिच्यासोबत तितक्यात कठीण परिस्थितीतून जात असतो. सरकारने स्त्रीसाठी मातृत्व रजा मंजूर केली आहे. मात्र आता याच धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजेसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली.

मातृत्व लाभ अधिनियम लागू असलेल्या खासगी, सरकारी आणि महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात 24 आठवड्यांची रजा देण्यात येते. मात्र अशा महिला कर्मचाऱ्यांसोबत इच्छा असूनही त्यांच्या पतीला राहता येत नाही. याच मुद्द्यावर  शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी पालिकेमध्ये ठराव मांडला होता. हा ठराव मंजूर झाल्याने आता बाळाची काळजी घेण्यास पुरुष कर्मचाऱ्यांनाही दोन आठवड्यांची रजा मिळणार आहे.

मुंबईसारख्या शहरात, विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये महिलांना गरोदरपणात काळजी घेण्यासाठी जवळची व्यक्ती नसते. अशावेळी पती घरी राहिल्यास महिलेला आधार मिळेत. केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱया पुरुष कर्मचाऱयांना त्यांच्या सेवा नियमावलीनुसार त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी दोन आठवड्यांची रजा दिली जाते. याच धर्तीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही राजा मिळणार आहे.