शेतात असलेली शौचालयाची टाकी साफ (Toilet Tank Cleaning) करताना पाच जणांचा गुदमरुन (Suffocation) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ (Sonpeth Taluka) तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरात घडली. दरम्यान, एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतू, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. मात्र, त्यातील एकालाच जीवंत अवस्थेत रुग्णालयात दाखल करता आले.
पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी अत्यावस्थ असलेल्या सर्वांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी डॉक्टरांनी पाच जणांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. उर्वरीत एकावर परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये सर्वजण मजूर आहेत. शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज अशी या सर्व मृतांची नावे आहेत. (हेही वाचा, Farmer Suicide in Parbhani: परतीच्या पावसाने सोयाबीनचं नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या)
परभणी येथील सोनपेठ तालुक्यात एका शेतात शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज, जमीर शेख यांनी शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम घेतले होते. दुपारी तीन वाजलेपासून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दरम्यान, टाकीची साफसफाई सुरु असताना मध्य रात्री अचानक त्यांना श्वास कोंडून गुदमरु लागले. योग्य प्रमाणात हवा आणि ऑक्सीजन मिळाले नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. हे सहा जण अत्यावस्थ असल्याचे उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने याबाबतची माहिती प्रशासनाला दिली. त्यांनंतर आरोग्य विभागाने भाऊचा तांडा येथे एक रुग्णवाहिका पाठवली आणि पीडितांना रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद या पाच जणांना डॉक्टरांनी तपासले मात्र त्यांना उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे जाहीर केले. यापैकी जमीर शेख याची प्रकृती प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना परळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.