Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर महाराष्ट्र सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाई विरोधात परमबीर सिंह न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करुन परमबीर सिंह यांनी खळबळउडवून दिली होती. या आरोपामुळे देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा तर द्यावा लागलाच. पण पुढे या प्रकरणात केंद्रीय संस्था ईडीने प्रवेश केला. सध्या अनिल देशमुख यांना ई़डीने अटक केली आहे. देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे परमबीर सिंह पुढे स्वत:च अडचणीत आले. त्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. त्यानंतर परमबीर सिंह हे स्वत:च काही काळ गायब झाले होते. पुढे न्यायालयानेही त्यांना फरार घोषीत केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर पुढे ते स्वत: मुंबईत आले आणि न्यायालयात हजर झाले. (हेही वाचा, Param Bir Singh Suspended: माजी मुंबई पोलिस आयुक्त आणि जेष्ठ आयपीएस ऑफिसर परमबीर सिंह यांचं निलंबन)

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक झाली. त्यात परमबीर सिंह यांचेच नाव पुढे आले. याच प्रकरणात पुढे सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या वसुलीचा आरोप केला. पुढे स्वत: परमबीर सिंह यांच्यावरच खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाला. याच प्रकरणांची तातडीने दखल घेत राज्य सरकारने चौकशी केली आणि परमबीर सिंह यांचे निलंबन केले. मात्र, परमबीर सिंह यांना निलंबनाची ही कारवाई मान्य नाही असे समजते. या कारवाई विरोधात ते न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.