महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामधील वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सिंह यांनी गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली होती. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने सिंह यांना फटकारले आहे. 'जेव्हा तुम्हांला या गुन्ह्याबद्दल कळालं तेव्हा एफआयआर का नोंदवला नाही? हे तुमचं कर्तव्य होते. पोलिस अधिकारी असूनही तुम्ही साधा गुन्हा नोंदवू शकलेले नाही' मग अशा घटनेमध्ये थेट सीबीआय चौकशीसाठी मागणी कशाच्या आधारे तुम्ही करता? न्यायालयात कशाचे आधारे तुम्ही हे आरोप सिद्ध करणार? असा सवाल विचारत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी खडेबोल सुनावले आहेत.
सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस दलामध्ये काही बदल करण्यात आले होते त्यावेळेस परमबीर सिंह यांनी काही अक्षम्य चूका केल्याने त्यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्याचं अनिल देशमुख यांनी जाहीर केले आणि नंतर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित देशमुखांनी 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान या खळबळजनक आरोपांनंतर सुरूवातीला सिंह यांनी सर्वोच्च न्यायालायमध्ये धाव घेतली होती. मात्र सुप्रिम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी नाकारत उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते.
आज मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली तर अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडत आहेत. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सध्या या प्रकरणाची सुनावणी होत आहे.