Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची गुन्हे शाखेन (Crime Branch) आज (25 नोव्हेंबर) सात तास चौकशी केली. परमबीर सिंह यांच्यावर विविध आरोप आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. गुन्हे शाखेची सर्व चौकशी पूर्ण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासाला आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, परमबीर सिंह याच्यावर असलेल्या इतर आरोपांसंदर्भातही त्यांना विविध चौकशांना सामोरे जावे लागणार आहे.

परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर एकदम प्रकाशझोतात आले. प्रसारमाध्यमांतून बातम्यांच्या ते केंद्रस्थानी राहिले. दरम्यान, परमबीर यांच्याविरोधातही पाच वेगवेगळ्या पोलीसस्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरु असताना वारंवार नोटीस बजावूनही परमबीर सिंह गैरहजर राहिले. परिणामी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले.

परमबीर सिंह यांना फरार घोषीत करण्यात आल्यानंतर त्यांना 30 दिवसाच्या मुदतीत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश होते. या आदेशाचे पालन करुन परमबीर सिंह हे जर हजर राहिले नाही तर त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला प्राप्त होणार होता. दरम्यान, परमबीर सिंह आता न्यायालयात हजर झाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, परमबीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी आरोप केला आहे की, परमबीर सिंह यांनी 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल कुठेतरी लपवून ठेवला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे परमबीर पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत.