Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारी लोकलसेवा मुंबईची लाईफलाईन झाली आहे. आता ही लाईफलाईन विस्तारणार आहे. पनवेल कर्जत लोकल सेवा सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली असून लवकरच या दोन स्टेशन्सला लोकद्वारे जोडण्याचे काम सुरु होईल. या लोकलसेवेमुळे अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. तसंच पनवेल-कर्जत प्रवासासाठी लागणारा वेळही वाचणार आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिडेट (Mumbai Railway Development Corporation Ltd.) यांच्याद्वारे पनवेल-कर्जत मार्गाचे काम सुरु करण्यात येईल. याठिकाणी एकच मार्गिका असल्याने अजून दोन मार्गिका तयार करण्यात येतील. सध्या असलेल्या मार्गिकेवरुन मेल, एक्स्प्रेसचा प्रवास होत असल्याने लोकलसाठी खास दोन मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. मात्र, सेवा सुरु होण्यासाठी किमान तीन-चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. (2-3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर 11 तासांचा मेगाब्लॉक; लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द)

पनवेल-कर्जत लोकलसेवेसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात येणार असून बँकेतून कर्जही घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार 783 कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पनवेल-कर्जत दरम्यानचे अंतर 29 किमी असून त्यात पनवेल, चौक, मोहापे चिखले, कर्जत ही पाच स्थानके असतील.