शब्दाला जागल्या नाहीत पंकजा मुंडे, मंत्रालयात झाले दर्शन; आमदारांनी अडवून विचारला जाब
पंकजा मुंडे (संग्रहित-संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात भरलेल्या खंडोबाच्या यात्रेदरम्यान झालेले पंकजा मुंडे यांचे भाषण चांगलेच गाजले. या भाषणादरम्यान पंकजा ताईंनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला होता. याबाबत आक्रमक झालेल्या पंकजा मुंडे यांनी, ‘जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही’, असे जाहीर वचन धनगर समाजाला दिले होते. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. या गोष्टीमुळे पंकजा मुंडे या आपल्या शब्दांना जागत नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत आहे.

नांदेड जिल्ह्यामधील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा भरली होती, यामध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'मी गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला या सभेत जाहीर वचन देते, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही', असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मात्र आज मंत्रालयात त्यांचे दर्शन घडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना अडवले, आणि त्यांना धनगर आरक्षण कधी देणार असा जाब विचारला. (हेही वाचा : धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही : पंकजा मुंडे)

यावर पंकजा मुंडे यांनी, 'मी मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे विधान केलेच नव्हते,' अशी प्रतिक्रिया देत ‘अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या पक्षाच्या आमदारांनी मला अडवले आणि जाब विचारला, मला अडवल्याने जर धनगर समाजाला आरक्षण मिळणार असेल तर मी मंत्रालयाबाहेर थांबायला तयार आहे,’ असे उत्तर दिले.