पंकजा मुंडे (Photo credit : youtube)

‘जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही’ असे जाहीर वचन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनगर समाजाला दिले आहे. नांदेड जिल्ह्यामधील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा भरली होती, यामध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी हे शपथवजा वक्तव्य केले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीबाहेरही जाण्याची तयारी आहे. धनगर समाजाच्या मेंढरांमागे येण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेत धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. धनगर समाज अनेक सुख सोईंपासून अजूनही वंचित आहे. मात्र दिल्लीत आणि राज्यात आपलेच सरकार असल्याने धनगर समाजाचे अनेक मुद्दे आपण मार्गी लावत आहोत असे त्यांनी सांगितले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही पंकजा ताई आक्रमक झाल्या होत्या. यावेळी, 'मी गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला या सभेत जाहीर वचन देते, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही' असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनगर आरक्षण दिल्यानंतरच आम्ही सत्तेत येऊ असे आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन झाली तरी, सर्वांच्या सोबत मी त्या आंदोलनात सहभागी होईन, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार करून, वर कॉटनचे कपडे घालून राजकारण करण्याचे दिवस आता गेले, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान धनगर समाजाच्या विकासासाठी भरघोस निधी पुरवण्यात याव्या अशी मागणी पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांसमोर करणार आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा मुद्दादेखील मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चर्चा केली होती.